Wednesday 28 May 2014

वि.दा.सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध

                                                   वि.दा.सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध

                   
                                 वि.दा.सावरकरांच्यावर आतापर्यंत विपुल लेखन झालेले आहे.तरीही वि.दा.सावरकर आणि त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध निवडण्यामागे नेमकी भूमिका आहे.एक म्हणजे प्रथम वर्षातील साहित्यातून समाजदर्शन या विषयात' विश्वाचा देव व मनुष्याचा देव' हा विज्ञाननिष्ठ निबंध आहे.तो विद्यार्थ्याना समजणे अधिक सुलभ व्हावे;दुसरे म्हणजे सावरकर म्हणताच त्यांची स्वातंत्र्यनिष्ठा,हिंदुत्वनिष्ठा,अस्पृष्योद्धाराचे कार्य,समुद्रात उडी मारण्याचे शौर्य इत्यादी माहिती सर्वसाधारणपणे असते;परंतु बुद्धिवादी,विज्ञाननिष्ठ विचारवंत म्हणून फारच थोड्यांना त्यांची ओळख असते.सावरकरांचे चिकित्सक अभ्यासक शेषराव मोरे यांच्या मते," अनुयायी व विरोधक दोघानीही सावरकरांच्या बुद्धीवादाकडे हेतुत: दुर्लक्ष केले आहे.त्यांचा बुद्धिवाद समजून घेण्याचा व देण्याचा दोघांनीही प्रयत्न केला नाही."१तिसरे म्हणजे त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार आजही मार्गदर्शक आहेत.कारण आज औद्योगिक आधुनिक समाजात विज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.आहे असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा विज्ञानाच्या आधारे जी वैज्ञानिक उपकरणे किंवा यंत्रे बनविली गेली त्याचा प्रसार सर्व सामन्याना अभिप्रेत असतो.ही आधुनिक यंत्रे वापरणार्‍या समाजात मात्र भ्रामक समजू
ती,पोथीनिष्ठा,व्यक्तिपूजा कर्मकांड यांची बजबजपुरी असते.या पार्श्वभूमीवर विज्ञाननिष्ठा म्हणजे काय?
वि.दा.सावरकरांनी ती समाजाची प्रवृत्ती व्हावी यासाठी लोकनिन्दा पत्करून केलेली धडपड, समजून घेणे महत्वाचे ठरते.त्यांनी विज्ञाननिष्ठ निबंध भाग१ व विज्ञाननिष्ठ निबंध भाग २ यातून १३ निबंध लिहिले.'क्ष किरणे' या ग्रंथातील निबंध,'जात्युत्तेजक निबंध व इतर निबंध' यातुनही त्यांची विज्ञाननिष्ठा वेळोवेळी डोकावते.किंबहुना त्यांच्या लेखनाची बैठकच बुद्धिवाद ही होती.
                            हे विज्ञाननिष्ठ निबंध लिहिण्यामागची प्रेरणा त्यांच्याच निबंधात व्यक्त झालेली दिसते.विज्ञाननिष्ठा वाढविणे हे बुद्धीवाद्यांचे कर्तव्य आहे.धर्म आहे  असे त्याना वाटते."ज्या अर्थी आम्हा सुधारकाना हे कळून चुकले आहे,की आमच्या हिंदू राष्ट्राच्या गळ्यासच तात देणार्‍या ह्या पोथी जात,जातिभेदाचा नी:पात केल्यावाचून हिंदूराष्ट्राचे अभ्युदय नि उज्जीवन होणे सर्वस्वी असंभाव्य होय,ज्या अर्थी आम्हा बुद्धिनिष्ठ विज्ञानवादी सुधारकांनी सर्व प्रकारचे धार्मिक भाबडेपणा नि लुच्चेगिरी मग ती वैदिक असो,बायबली असो,कुराणीय असो वा पुराणीय असो- तिच्या कचाट्यातून मानवी बुद्धीला मुक्त करणे हेच आमचे पवित्र धर्मकृत्य होय.ह्यातच अवघ्या मानव्याचे,मनुष्यजातीचे कल्याण असे वाटत आहे."२
                        यामुळे लोकनिंदेला पात्र व्हावे लागणार आहे हे त्याना माहित आहे.लोकहितासाठी लोकप्रियतेचा त्याग करावा लागतो.सत्याची कास धरून प्रचलित जनघातक रुढीचा उच्छेद करणार्‍याला नेहमीच छळ सोसावा लागतो.आज कोटीकोटी लोकांचे देव बनलेल्या जिझस,बुद्ध, महंमद यांची ते यासाठी उदाहरणे देतात.
                        हा बुद्धिवादाचा भडीमार आवश्यकच आहे पण "हेटाळणीने नव्हे,रागाने नव्हे, गंमत म्हणून नव्हे,द्वेषाने तर नव्हेच नव्हे.आपल्या राष्ट्राला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आमच्या पुढारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हे आपले परम कर्तव्य आहे.हाच एक खरा धर्म आहे"३हे केवळ हिंदू धर्मियांपुरते मर्यादित नाही.तर ख्रिस्ती,मुसलमान इत्यादी धर्मातील अज्ञानी लोकांसाठीही आहे." ही अज्ञानाची रोगट साथ जी फैलावली जात आहे ती हटवून त्याना सुद्धा विज्ञानाच्या शुद्ध वातावरणात नेऊन सोडणे बुद्धिवाद्यांचे कर्तव्य आहे.कारण गावामध्ये काणत्याही भागात रोगाणु जोपासले गेले की त्यांचा उपद्रव सार्‍या गावाचे आरोग्य संकटात पाडल्यावाचून सहसा होत नाही."४
                       एखाद्या निष्णात वैद्याने रोग्याची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण करणार्‍या जुनाट रोगाची कारणे शोधावीत.त्याला सबळ करण्याचे आव्हान स्वीकारावे तसेच सावरकरांनी पारंपारिक समाजातील दोष शोधून काढले आहेत.राष्ट्र प्रबळ व्हावयाचे तर आधुनिक व्हावयास हवे.आधुनिक होण्यासाठी विज्ञाननिष्ठ व्हावयास हवे.विज्ञाननिष्ठ होण्यासाठी समाज हिंदू असो,मुस्लीम असो,किंवा कोणताही;त्यात सुधारणा व्हावयास हवी.येथे प्रथम विज्ञाननिष्ठा म्हणजे काय ते पहावे लागेल.विज्ञान ही संज्ञा सावरकर दुहेरी अर्थाने वापरतात.एक वैज्ञानिक म्हणजे बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन आणि दुसरा विज्ञानाने निर्माण केलेले तंत्रज्ञान.समाजाला सबल बनवायला मुलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्हीची त्याना गरज वाटते." समाजकारणात विज्ञानाचे वर्चस्व स्थापिले पाहिजे तसेच आपल्या राष्ट्राच्या अर्थकारणातही त्याच विज्ञानाची मूर्ती जे यंत्र त्या यंत्राचे वर्चस्व स्थापिले पाहिजे"५
                      म्हणजेच विज्ञाननिष्ठा म्हणजे केवळ आधुनिक साधनांचा वापर नाही तर प्रत्य्क्ष प्रयोग, अनुभव, तर्क इत्यादींच्या आधारे सत्यशोधन करणा र्‍या दोन गोष्टींचा कार्यकारण शोधणारी ती एक बुद्धिनिष्ठ शास्त्रीय पद्धती आहे.बुद्धिनिष्ठा म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी बुद्धीचा आधार घेणे. बाबावाक्य प्रमाण,पोथीनिष्ठा देवभोळेपणा,हे बुद्धिनिष्ठेला मान्य नसते.जुना समाज तर याच आधारावर उभा होता.नवीन समाजरचना घडवायची तर हा आधार उध्वस्त करून नवीन विज्ञान धर्माची स्थापना करणे हे त्याना प्रथम आवश्यक वाटते.इहलोकातील सुखासाठी इहलोकातच पाळावयाचे नियम,आचार वा कर्तव्ये म्हणजे धर्म असा धर्माचा अर्थ ते सांगतात." जे सृष्टीनियम विज्ञानास  प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगांनी सर्वथैव अबाधित शाश्वत सनातन सत्य आढळून आले आहेत तेच काय ते सनातन धर्म होत."६
                       पारलौकिक वास्तवाचे असे ज्ञान झालेले नसल्यामुळे तो विषय प्रयोगावस्थेत आहे.असे समजावे.व प्रयोगसिद्ध नसल्याने त्याना सनातन म्हणू नये.असे ते सांगतात.अशा धर्माच्या आड पोथीनिष्ठा येत असल्याने पोथीनिष्ठेवर ते प्रहार करतात.हिंदू,मुस्लीम,ख्रिस्ती सर्व ध्रर्मावर हा प्रहार असतो.दूरध्वनीचा शोध लागल्यावर धर्मग्रंथात त्याची माहिती नसल्याने पोथीनिष्ठानी ते स्वीकारण्यास केलेली खळखळ "पोथीनिष्ठेची बाधा" या त्यांच्या निबंधातून मुळातूनच वाचली पाहिजे.
   "बिचारे यंत्र मध्य अरबात ते मुसलमानी ठरते,स्पेनात ख्रिस्ती,रशियात नास्तिक.Godless!ती त्यातून बोलेल ते त्याचे मत तो त्या यंत्राचा धर्म! सामान्यत: मनुष्यही या अशा शब्दनिष्ठ धर्म प्रकरणी असेच एक दुरध्वनी यंत्र नव्हे काय?.... लहान पणी एकाच्या कानात कुराण हाच धर्म गुणगुणले की तो मुसलमान,बायबल हाच धर्म पठविले की तो जन्माचा ख्रिस्ती! कुराण खरे की बायबल की वेद हे त्याला स्वत:ला तोलून पहायची सोयच नाही!"७
                        मनुष्याने धर्माचे नुसते दुरध्वनी यंत्र न बनता शब्दनिष्ठेचा त्याग करून बुद्धीनिष्ठा आचरावी असे ते सांगतात.बायबल,कुराण,वेद,श्रुती,स्मृती पुराणे सारे आदरणीय नि अभ्यासनीय असे ग्रंथ आहेत.परंतु ते मनुष्याने निर्माण केलेले असून ते मनुष्यांनी निर्माण केलेल्या इतर ग्रंथाप्रमाणेच अभ्यासावेत.त्यातील मनुष्यहितास योग्य असलेले विज्ञानाची कसोटी लावून आचरावे.व जे अनुभवांअंती टाकाऊ बुद्धिशून्य,अडाणी ठरते ते त्यागावे.
                       पोथीनिष्ठेबरोबर धर्मभोळ्या,देवभोळ्या समजुतीवरही ते कडाडून हल्ला करतात.या धर्मभोळ्या अज्ञानाचा उदोउदो करणारे तीन वर्ग असल्याचे ते सांगतात.ते म्हणजे धंदेवाईक नेणते,नेणते भाबडे,जाणते संकोची.या सर्वाना वाटते सावरकर बुद्धीभेद करतात.व लोकांच्या भावना दुखवितात.सावरकर तर्काच्या आधारावर त्यांचे म्हणणे खोडून काढतात.व सांगतात "आम्ही खर्‍या अर्थी धर्म भावना उच्छेदित नाही.बुद्धीभेदही करीत नाही,तर उलट आपल्या हिंदुराष्ट्राच्या नि मनुष्यमात्राच्या उद्धरणास जेजे आवश्यक तेते कर्तव्य आणि प्रत्य्क्ष प्रयोगाअंती जे अबाधितपणे टिकून राहते ते सत्य याचाच प्रचार करीत असल्याने सदधर्माला,सदभावनेला हानिकारक ठरणार नाही.करीतच असेल तर दुर्बुद्धीभेद् करीत आहे अपधर्म भावना दुखवित आहे."८
                    दुर्बुद्धीभेद् करीत धर्मभोळेपणाची खिल्ली उडविताना यज्ञाचे महत्व कसे संपलेले आहे अग्नीचे देवत्व का संपलेले आहे.याचा चिकित्सक परामर्श ते घेतात.गोपालन हवे गोपूजन नव्हे हे सांगताना पशुपालन म्हणून पाहणार्‍या अमेरिकेतील गायींची सुस्थिती व देव म्हणून पूजा होते त्या गायींची भारतातील दुरवस्था वर्णन करतात." हा प्रश्न एका फुटकळ धर्म समजुतीचा नाही.अशा धार्मिक छापाच्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धीहत्या करीत आहेत.प्रश्न आहे तो भाकड प्रवृत्तीचा! तिचे उपलक्षण म्हणून आम्ही गायीची गोष्ट निवडली."९असे ते सांगतात.हिंदूंचे अंत्यसंस्कार करताना पक्क्या बंद स्वच्छ पेटीत प्रेत झाकून नेणे कसे सोयीस्कर आहे हे बुद्धिवादी दृष्टीने ते पटवितात.हिंदूंची प्रेताला अग्नी देण्याची पद्धत त्याना पटते.परंतु ती देखील धर्मग्रंथाने सांगितल्यामुळे नव्हे तर उपयुक्ततेच्या दृष्टीकोनातून.येथेही विद्युतदाहिनी अधिक सोयीस्कर उपयुक्त असे ते पटवितात.अंत्ययात्रेसाठी तिरडीवरून नेल्या जाणार्‍या प्रेताचे वर्णन,गोग्रासाचे वर्णन,यज्ञाच्या अवडंबराची खिल्ली ते इतक्या तर्ककठोरपणे करतात की धर्मभोळ्याच नव्हे तर श्रध्दावान नसणार्‍याच्याही अंगावर सरसरून काटा यावा.
                     जुन्या समाजरचनेचे शल्यविच्छेदन करून ते थांबत नाहीत तर समाजरचना कशी असावी हेही सांगतात.आधुनिक समाज घडविण्यासाठी शास्त्राधाराचे एरंडाचे गुर्‍हाळ ते बंद करावयास सांगतात..श्रुतीपुराणोक्ताची बेडी म्हणजेच ग्रंथ प्रामाण्याची बेडी प्रथम तोडावयास सांगतात.त्या जुन्या ग्रंथाबाबत त्याना आदर आहे.त्यातील ज्ञान घ्यावे अज्ञान टाकावे असे ते सांगतात.
                  " ही प्राचीन .श्रुतीपुराणादि शास्त्रे ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात,सन्मानपूर्वक ठेऊन आता विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे.त्या ग्रंथाचा काल काय ते सांगण्याचा अधिकार.आज काय ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानाचा.अद्ययावतपणात मागच्या सर्व अनुभवांचे सार सर्वस्व सामावलेले असते."१०
हा .अद्ययावतपणा म्हणजे काय? कालपर्यंतच्या जुन्यातील जे प्रयोगांती उत्तम ठरते ते ज्ञान आम्ही टाका म्हणत नाही......आजच्या विज्ञानाच्याकसोटीने जे राष्ट्रधारणास उपयुक्त तेच बेधडकपणे वापरावे उद्या बदलत्या परिस्थितीत वा वाढत्या वैज्ञानिक ज्ञानात जर तेही चुकीचे नि अहितकारक ठरेल तर तो आमचा आजचा आचार बदलण्यास उद्याही तसाच स्वतंत्र आहे.केवळ कालच्या पोथीच्या शब्दाने आज बांधलेला नसावा.उद्या तर नसावाच नसावा.या  विज्ञाननिष्ठ मतासच आम्ही .अद्ययावतपणा म्हणतो.अद्यतनी प्रवृत्ती हीच" ११ अशी अद्यतनी प्रवृत्ती युरोप अमेरिकेत असल्याने ते देश पुढे गेले.ते देवभोळे होते तेंव्हा तेही दुर्बल होते.परंतु आता मात्र "त्यांचा प्रत्येक आज कालच्याहून इतका अधिक समंजस,सकस,सरस ठरत आहे की त्यांचा कालवरचा विश्वास ढळून आजवरचा अढळपणे बसलेला आहे."१२ही प्रवृत्ती वाढण्यासाठी देवभोळेपणात घट होऊन यंत्रशीलपणा वाढला पाहिजे असे त्याना वाटते.
                        देवभोळेपणामुळे प्रत्येक घटनेचे कारण देवाची लहर,कृपा,कोप असे शोधले जाते त्याचे निराकरण व्हावे म्हणूनही प्रार्थना,पूजा सत्यनारायण,जपजाप्य,जादूटोणा यांचा अंगीकार केला जातो.परंतु यंत्रशीलपणा हा या सृष्टीतील भौतिक व्यापार ठराविक सृष्टीनियमाचे फलित होय,आणि जर त्या नियमाप्रमाणे
आपण तेते घटक जुळवून आणू शकलो तर ते कार्य घडलेच पाहिजे,या निष्ठेवरच काय ती अधिष्ठानलेला असणार,अमुक अंशपर्यंत पाण्याचे उष्णतामान वाढविले की पाण्याची वाफ झालीच पाहिजे.मग त्यावेळी तो यांत्रिक नमाज पठणाचे विसरल्यामुळे अल्ला रागावलेला असो वा संध्या करण्याचे टाळल्याने देव चवताळलेला असो..... देवाने का म्हणता,पण जे सृष्टीनियम एकदा घालून दिले त्यात देव देखील पुन्हा बदल करू शकणार नाही."१३ यंत्रशास्त्राचा भक्कम पोलादी पुतळा धर्मशास्त्राच्या पायावर उभारण्याचा प्रयत्न त्याना हास्यास्पद वाटतो.यंत्राने बेकारी वाढते ही कल्पनाही ते खोडतात." बेकारी यंत्राने वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते.आणि  विषम वाटणीचा दोष यंत्राचा नसून समाजरचनेचा आहे."१४
                           या पार्श्वभूमीवर देवभोळेपणा कमी करणारी विश्वाच्या देवाची नवी संकल्पना ते मांडतात.विश्व हे माणसाच्या सुखासाठी निर्माण झाले.ही कल्पना ते खोडून काढतात.मानुष्य विश्वाच्या अनंत काळाच्या असंख्य उलाढालीतील एक तुच्छ परिणाम आहे.असे पटवतात.सत्यनारायणाने तो प्रसन्न होणार नाही."विश्वाची नियमबद्धता समजून घेऊन मनुष्य जातीच्या हिताला आणि सुखाला ती पोषक कशी होईल हे पाहणे महत्वाचे.विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही, फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे,फार फार मोठ्या अंशी प्रतिकूल आहे;हे धीटपणे समजून घेऊन त्यावर बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा!"असे त्याना वाटते.
                          एकदा ही विश्वाच्या देवाची कल्पना समजून घेतल्यावर कोणत्याही चळवळीला भगवन्ताचे अधीष्ठान असावे लागते हे मानणे निरर्थक ठरते." सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील त्याचे." इतकेच काय ते खरे.आणि वैज्ञानिक,सामर्थ्यशील,प्रत्य्क्षनिष्ठ अशा ऐहिक साधनांनी विपक्षाहुन वरचढ होण्याचा यत्न करावा.
" ऐहिक विजयाचा मार्ग हाच!अन्यायी परोपद्रवी व्हावे असे नव्हे तर न्याय झाला तरी तो समर्थ नसेल तर व्यर्थ होय.समर्थ अन्याय त्यावर कुरघोडी केल्यावाचून राहणार नाही.दुर्बल पुण्याई ही पंगु होय.नुसत्या एकशे आठ काय अकराशे आठ सत्यनारायणाच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाही.कारण ते चळवळीच्या भौतिक सामर्थ्यावरच अवलंबते"१६
                    रोग निवारणार्थ वापरलेल्या जहाल प्रतिजैविकांनी व्याधी बरी होण्याबरोबर शरीर स्वास्थ्य राखणार्‍या काही आवश्यक कार्यावरही दुष्परिणाम होतो.तसेच बुद्धिवादाच्या अतिरेकी मार्‍यामुले होईल का? अशी शंका सावरकरांचे  विज्ञाननिष्ठ निबंध वाचताना येत राहते.परंतु समाजसुधारक सावरकराना याचे भान आहे.मानवी जीवनात बुद्धीबरोबर श्रद्धा व मन हेही महत्वाचे घटक असतात.प्रखर बुद्धिनिष्ठा सरर्वसाममान्याना पेलणारी नसते.म्हणून ज्या श्रद्धा खर्‍या का खोट्या याचा निश्चित निर्णय लागलेला नाही व ज्या मनुष्य हीतास हानिकारक नाहीत अशा श्रद्धांचा माणसाच्या हितासाठी वापर करणे त्याना अनुचित वाटत नाही.बुद्धिवादाला अशा रीतीने ते उपयुक्तातावादाची मर्यादा घालतात.त्यांचा बुद्धिवाद ते बुद्धीभेदाकडे झुकू देत नाहीत.परंतु हे सर्व समजून घेण्यासाठी सावरकरांच्या  विज्ञाननिष्ठ निबंधांबरोबर त्यांचे इतर सर्व लेखन व कार्य जाणून घेणे महत्वाचे ठरते.या लेखाचा मर्यादित हेतू सुरुवातीलाच सांगितल्यामुळे सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचण्याची ते वाचून सावरकरांचे इतर लिखाणवाचण्याची आणि या सर्वातून सावरकर नेमके पणाने समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे हे महत्वाचे.वाटते.
                                    संदर्भ
१) शेषराव मोरे,.सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास,'निर्मल प्रकाशन',नांदेड पृ.३
२)वी.दा सावरकर, 'जर का पेशवाई असती'
    समग्र सावरकर वाङमय,खंड ३रा पृ ४१९
३)तत्रैव -'न बुद्धिभेद जयते' पृ ४०२
४) तत्रैव -'यंत्र' पृ.३८७
५)- " -'सनातन धर्म कोणता' पृ.३१५
६) -" -' पोथीनिष्ठेची बाधा' पृ.१७४
७) -" - 'आमच्या धर्म भावना दुखू नका' पृ.४२४
८) -" - 'गोपालन हवे गोपूजन नको' पृ.३५१
९) - " -' आजच्या सामाजिक क्रांतीचे दूत' पृ ३७०
१०) -" -'पुरातन की अद्यतन' पृ.३७७
११) -" - 'दोन शब्दात दोन संस्कृती' पृ.३५५
१२) -"- 'यंत्र'पृ.३८२
१३) -" - 'यंत्राने का बेकारी वाढते'पृ.३९८
१४) -" - 'मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव'पृ.२९७
१५) -" - ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय/'पृ.३०६
टिळक विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या माध्यम १९९६-९७ अंक २मधील सदर लेख छापण्यास परवानगी दिल्याबद्दल विद्यापीठ व्यवस्थापनाचे आभार.



                   
                       
                                         

Sunday 25 May 2014

आंतरभारती : सानेगुरुजींचे स्वप्न

                                    आंतरभारती : सानेगुरुजींचे स्वप्न

                             भारतीय स्वातंत्र्याला अर्धशतक उलटून गेले.या काळात काही कमावले काही गमावले.गमावलेल्या बाबीत महत्वाची बाब म्हणजे राष्ट्राच्या एकात्मतेला गेलेले विविध तडे.स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांना हाकलण्याच्या कैफात फुटीरतेची विषवल्ली कशी फैलावत गेली ते समजलेच नाही.काही द्रष्ट्या विचारवंताना मात्र याचे भान होते.त्यातील एक सानेगुरुजी.'खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे' असे सांगणार्‍या सानेगुरुजीना जातीभेद,प्रांतभेद,भाषाभेद,हे रुचणे शक्यच नव्हते.विविधतेतील ऐक्य अनुभवता आले तर विविधाता वैभवाचे साधन बनते.तसे झाले नाही तर मात्र ती वैराला कारणीभूत ठरते.विविधतेतील एकता अनुभवता येण्यासाठी माणसामाणसांची हृदये एक झाली पाहिजेत. हृदये एक करण्याची ताकद भाषा व साहित्य यात आहे.यातून त्याना आंतरभारतीची कल्पना सुचली.आंतरभारती हे त्यांचे स्वप्न होते.ध्यास होता.
                           आंतरभारतीची कल्पना त्यांनी स्वातंत्र्यानंतर मांडली असली तरी व्यक्तिगत जीवनात हे तत्व त्यांनी आधीच आत्मसात केले होते.स्वामी रामकृष्ण,रवीन्द्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांच्या विचाराचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता.स्वामीरामकृष्णांची धर्मसमन्वयवृत्ती ,रवींद्रनाथांची पूर्व व पश्चिम यातील समन्वय द्रष्टी व महात्मा गांधींचे सर्वसमन्वयाचे प्रयोग यांचे त्याना आकर्षण होते.अमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात ते अध्ययनासाठी गेले.तेथे गुजरात,बंगाल,मद्रास येथील व्यक्तीही अध्ययनासाठी आल्या होत्या.परस्पर संपर्कातून भाषा हा एकमेकांची मने जोडण्याचा सेतू आहे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी बंगाली भाषा शिकून घेतली.रवींद्र संगीत अभ्यासले.आपल्या कित्येक कवितांच्या रचना बंगाली चाली देऊन केल्या.१९३०-३२ च्या सत्याग्रहात त्याना त्रीचनापाल्लीच्या तुरुंगात ठेवले होते तेथे त्यांनी दक्षिणी भाषांचा अभ्यास केला.सुब्रम्हण्यम भारतींच्या काव्याचा परिचय करून घेतला.'तामिळवेद' अशी पदवी असलेल्या कुरळ ग्रंथाचा त्यांनी अनुवाद केला.गुजराती सत्याग्रहींशी आलेल्या संबंधातून त्यांनी गुजराती साहित्याचा अभ्यास केला काही गुजराती साहित्याचे अनुवादही केले.विनोबांच्या गीता प्रवचनाचे लेखनही तुरुंगात झाले.या सर्व काळात त्यांची समन्वय दृष्टी अधिकच दृढ झाली.भारतीय संस्कृतीचे माहात्म्य सांगणार्‍या अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी या काळात केले.१९४० -४२च्या स्वातंत्र्य लढयातही त्याना तुरुंगवास सोसावा लागला.त्यावेळी त्यांनी चीनी व इस्लामी संस्कृतीचा अभ्यास केला त्यावर लेखनही केले.त्याना भारतीय संस्कृतीत जाणवणारी समन्वय दृष्टी हे वृथा अभिमानाचे नव्हे तर या सर्व अभ्यासक्रमाचे फलित होते.
                        स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्र उभारणीसाठी पाश्च्यात्यांच्या आक्रमक राष्ट्रवादाचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला साजेशा विश्वबंधुत्वाच्या कल्पनेत राष्ट्रवाद वाढावा अशी सानेगुरुजींची इच्छा होती.भाषा,धर्म,प्रांत अशा विविध स्तरावर एकता निर्माण होणे ही सांस्कृतिक गरज होती.राजकारणी मात्र स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी जिथे तिथे फुटीरता निर्माण करीत होते.स्वतंत्र भारताची टोलेजंग इमारत उभारायची तर ती प्रेमाच्या पायावर उभी राहणे आवश्यक होते.आणि परस्पर प्रेम निर्माण होण्यासाठी सांस्कृतिक चळवळ उभी राहणे आवश्यक आहे असे त्यांच्या लक्षात आले.आंतरभारती हा त्यांच्या आत्म्याचा  हुंकार होता.त्यांच्या समन्वय दृष्टीची सांस्कृतिक मूर्ती होती.
                      १९४७ला साधना साप्ताहिक सुरु झाले.त्यात प्रांतभारती नावाचे सदर असे.त्यातून भारतातील विविध प्रांतातील साहित्याची ओळख करून दिली जाई.विविध लेखामधून,व्याख्यानातूनही त्यांनी आंतरभारती या नव्या कल्पनेचा प्रचार सुरु  केला. (प्रथम त्याला ते प्रांत भारती म्हणत.पुढे त्यांनी आंतरभारती हे नामांतर केले.)
                  १९४९च्या मे मध्ये पुण्यात आचार्य जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन भरले.त्यात सानेगुरुजीनी प्रांतभारतीचा ठराव मांडला.महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी पाठिंबा दिला.सर्वानुमते ठराव मंजूर झाला.
                   सानेगुरुजीना आंतरभारती या सांस्कृतिक चळवळीची प्रेरणा रवीन्द्रनाथ टागोरांच्या विश्वभारतीतून मिळाली.'यत्र विश्व भावती एकनीडम' हे विश्वभारतीचे घोषवाक्य आहे. 'मानव मात्र सर्वत्र एक आहे त्याचे हृदय सर्वकाळी सर्व ठिकाणी एकतेचे स्पंदन करीत आहे' असे रवींद्रनाथ सांगत.विश्वबंधुत्वाचा आदर्श, जगापुढे ठेवण्यासाठी त्यांनी आपली वाणी,लेखणी सतात झिजविली.राष्ट्र ,धर्म,संस्कृती यांच्या दुराभिमानाने मानवकुलाच्या एकतेला तडा जातो.भेदातून अभेद पाहण्याची. भारतीय संस्कृतीतील समन्वय दृष्टी त्यासाठी उपयोगी आहे.याद्वारे विविधतेतून विद्वेष निर्माण न होता विविधतेतील सौंदर्य जाणवेल.सत्ता संपत्ती यांच्या स्पर्धेत मानवी संस्कृतीचा नाश होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.त्यामुळे स्पर्धेऐवजी सहकाराचा मंत्र जपला पाहिजे.व द्वेषाऐवजी प्रेमाला थारा दिला पाहिजे.हीच दृष्टी राजकीय आर्थिक व सामाजिक जीवनात स्वीकारली तर मानवी जीवन सुखावह व संपन्न होईल.रवींद्रनाथ यांच्या  या विचारचा पुरस्कार करणारे अनेक विचारवंत व कलावंत निरनिराळ्या राष्ट्रातून निर्माण झाले.व विश्वभारतीची भारतात निर्मिती झाली.
                        सानेगुरुजींच्या आंतरभारतीच्या कल्पनेमागे  विश्वभारतीचेच तत्वज्ञान आहे.विश्वभारतीमध्ये जागतिक पातळीवर एकता सहजीवन निर्माण व्हावे ही इच्छा आहे.तर आंतरभारतीमध्ये भारताच्या प्रांताप्रांतात प्रेमभावना वाढणे व सहजीवनाची निर्मिती होणे ही भावना आहे.आचार्य भागवतांच्या शब्दात सांगायचे तर 'विश्वभारती हे पराष्ट्रीय धोरण (फॉरेन पॉलीसी),तर आंतरभारती हे भारताचे अंतर्गत धोरण (इंटर्नल पॉलीसी )आहे.रवींद्रनाथांच्या विश्वभारतीमागे भारत व विश्व याना जोडणारी विशाल योजना होती.तर आंतरभारतीचे प्रयोजन भारतीय गणराज्यातील विविध भाषांचा व सांस्कृतिक चळवळीचा परामर्श घेणे हे होते.भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना आंतरराष्ट्र्वाद या विकसित रुपात परीवर्तीत होण्यासाठी प्रथम एक राष्ट्र ही भावना निर्माण होणे आवश्यक होते.यासाठी भारतीयत्व व प्रदेशिकत्व यांचा मेळ आवश्यक होता.पण प्रत्यक्षात  मात्र या काळात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली.आणि राजकारणी लोकांनी याचा उपयोग लोकशाही दृढमूल होण्यासाठी न करता परस्पर द्वेष निर्माण होण्यासाठी केला.आंतरभारतीची चळवळ यावर उतारा होती.
                         आंतरभारतीच्या चळवळीमागे आणखी एक उद्देश होता.तो म्हणजे लोकभाषांचा विकास.लोकशाहीच्या विकासासाठी लोकभाषांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे.विकास झाला पाहिजे.शिक्षणाच्या क्षेत्रात,व्यावहारिक  क्षेत्रात लोकभाषांचा वापर झाला पाहिजे.लोकशाही हे लोकांचे राज्य असल्याने सर्वसामान्यांच्या भाषेत व्यवहार झाल्याने लोकमानस समृद्ध होईल आणि लोकशाही दृढमूल करणारी लोकशक्ती निर्माण होईल.भारतात मराठी,गुजराथी,हिंदी,बंगाली तामिळ,उडिया काश्मिरी,पंजाबी,कन्नड,तेलगु,मल्याळम या १२ प्रदेश भाषा आहेत.शिवाय उर्दू व सिंधी भाषिकही बहुसंख्य आहेत.एकीकडे या सर्व भाषांचा विकास व्हावयास हवा.व दुसरीकडे या भाषांच्या अभिमानाचे दुराभिमानात रुपांतर होऊ नये याचीही दक्षता घ्यावयास हवी.राष्ट्रभाषा हिंदी प्रदेश भाषांना मार्क न होता सर्व १४ भाषा राष्ट्रभाषाच आहेत अशी व्यापक भावना वाढीस लागावयास हवी.दक्षिणेकडील लोकांनी हिंदीबद्दल आकस धरू नये,उत्तरेकडील लोकांनी स्वखुशीने एखादी दक्षिणी भाषा शिकावी.भिन्न असलो तरी अभिन्न आहोत,हीआंतरभारतीची स्नेहार्दता यातून निर्माण होईल.एकीकडे प्रदेशभाषांची वाढ व दुसरीकडे भिन्न प्रादेशिक भाषांचा एकमेकात परिचय यांची आज नितांत गरज आहे.इंग्रजीचा प्रचंड पगडा आज सुशिक्षितांच्यावर  आहे इंग्लंड,अमेरिकेच्या साहित्यिकांची माहिती असते.परंतु स्वत:च्या भाषेतील साहित्याची व शेजारच्या साहित्यिकांची माहिती नसते.शेजारच्या राज्यातील साहित्यिकांची माहिती असणे तर दूरचीच बाब.
                          भारतातील सुशिक्षिताना भारतीय भाषेतील साहित्याची आणि कलांची माहिती करून देणे हे आंतरभारतीचे कार्य आहे.साहित्यात माणसाच्या मनाना एकत्र आणणारी शक्ती असते.साहित्याच्या परिशीलनाने माणसाची मने संकुचित भेदभावाच्या पलीकडे जाऊ शकतात.आंतरभारतीच्या द्वारे साहित्यानिष्ठा व त्याद्वारे मनाची विकसितता या गोष्टी साध्य करता येतील.
                         साने गुरुजी आंतरभारतीची कल्पना नुसती मांडूनच थांबले नाहीत,तर त्यांनी कृतीला सुरुवात केली.आंतरभारती संस्था सुरु करण्याच्या दृष्टीने त्यांनी मुंबईच्या जवळ जोगेश्वरी येथे ९९ वर्षाच्या कराराने जागा घेतली.विविध ठिकाणी प्रवचने देऊन संस्थेसाठी पैसा मिळवायचे ठरविले.दक्षिणेत कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा भागात ते गेले.हुबळी,कारवार,धारवाड या भागात तीन तीन दिवस गीतेवर प्रवचने केली.अहमदाबादेतही गेले.आंतरभारतीच्या ध्यासाने पछाडलेल्या सानेगुरूजीचे त्यानंतर काही काळात निधन झाले.त्यांच्या चाहत्यांनी व स्नेह्यांनी आंतरभारतीची रीतसर स्थापना केली.महाराष्ट्रातील प्रमुख शहरी आंतरभारतीची केंद्रे स्थापन झाली.अहमदाबाद येथे उमाशंकर जोशी या गुजराती साहित्यिकांनी आंतरभारतीचे केंद्र स्थापन केले.भारतीय नागरिकात परस्पर प्रेमभाव निर्माण करणे,एकात्मतेची वाढ करणे,राष्ट्रप्रेम समता,मानवता,जातीधार्मातीत नागरिकता,विज्ञाननिष्ठा यांच्या पायावर एकात्मता निर्माण होता असल्याने या मूल्यांचे संवर्धन करणे,देशातील विविध भाषिक राज्यात्व समुहात सार्वत्रिक संबंध प्रस्थापित करणे,आंतरराष्ट्रीय बंधुभाव निर्माण करणे ही आंतरभारतीची उद्दिष्टे सांगितली गेली.या उद्दिष्टांशी बांधिलकी राखू शकणार्‍या कोणत्याही भारतीयाला तिचे सदस्य होता येते.ही संस्था राजकारणापासून मुक्त असेल असे जाहीर केले गेले.असे असले तरी विविध राजकीय पक्षाकडून राष्ट्रीय एकात्मतेत वाढ करण्यासाठी मदत घेतली जाईल.असेही नमूद केले गेले.
                          गुरुजी आंतरभारती संस्थेचे जे स्वप्न पाहात होते त्यात सर्व भाषातील ग्रंथांचे समृद्ध ग्रंथालय असावे,एक विद्यालय असावे,तेथे शेती व हस्तोद्योग असावेत,सर्व भारतीय भाषा शिकवल्या जाव्यात,वेगवेगळ्या प्रांतातील संस्कृतीचा परिचय एकमेकाना करून दिला जावा.अशी कल्पना होती.भारताला ते विश्वाची प्रतिमूर्ती मानत.भारतात विविध धर्म,वंश,संस्कृती यांच्या समन्वयाचा प्रयोग अनादिकाळापासून चालू आहे.त्यातून निर्माण झालेली संस्कृतीची धारा सर्व माणसांपर्यंत पोचविणारी ती आंतरभारती.आंतरभारती ही भारताच्या आत्म्यातून निघालेली हृदयाची हाक असल्याने तिला भौगोलिक सीमा जखडून ठेवत नाहीत.शब्दाच्या पलीकडील सुक्ष्मातिसुक्ष्म भावही ती व्यक्त करू शकते,दुसर्‍यापर्यंत संक्रमित करू शकते.अशी भावसाक्ष्रता भारताच्या एकात्मतेसाठी गरजेची आहे.ही भावसाक्षरता संक्रमित करण्याची कुवत राहिली नाही तर समाज भावशून्य क्रियाशून्य होतो.त्यामुळे ही भावहीनाता मिटवण्याचे कार्य करणारी ती आंतरभारती.
                      साने गुरुजींच्या स्वप्नातील आंतरभारती जशीच्या तशी उतरवता आली नाही तरी त्यांच्या अनेक धडपडणार्‍या मुलांनी त्या स्वप्नाच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला.आपले सर्व आयुष्य पणाला लावले.यदुनाथ थत्ते,चंद्रकांत शहा,वा.य.परीट गुरुजींनी अशा अनेकांचा त्यात महत्वाचा वाटा आहे.यदुनाथ थत्ते याना आंतरभारतीचा प्रतिनिधी म्हणून भारतभर प्रवास करण्याचा रेल्वेचा पास मिळाला होता.त्यांनी भारतभर प्रवास करून भारताच्या  राज्यातील  बहुरंगी संस्कृतीचा,त्यातील जेजे भव्य सुंदर त्याचा वेध घेतला'.साधना' या नियतकालीकाच्या माध्यमातून साने गुरुजीना अपेक्षित भावसाक्षरता लोकांच्या मनामनात पोचविण्याचा प्रयत्न केला.अनेक कार्यकर्ते तयार केले.साधनातून लेखकाना,कार्यकर्त्याना विविध विषयावर लिहिते केले.राजा मंगळवेढेकर यांच्यासारखे साहित्यिक,नरहर कुरुंदकर यांच्या सारखे विचारवंत यातून तयार झाले,आंतरभारतीच्या चळवळीत सामील झाले.चंद्रकांत शहा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गुजरात कर्नाटक अशा विविध प्रांतात न्यायचे. परीट गुरुजी आज ७६ वर्षाचे आहेत(आज तेही हयात नाहीत.)..यदुनाथ थत्ते,चंद्रकांत शहा हे साथीदार गेले.तरी न डगमगता तरुणांच्या उत्साहाने देशभर आंतरभारतीचे कार्य करत फिरत आहेत.देशभरातील शाळातून भारतीय संस्कृतीची,सानेगुरुजींची,आंतरभारतीची आणि आंतरभारतीने स्वीकारलेल्या मुल्यांची महती सांगत आहेत.महिन्यातील फक्त तीन दिवस ते स्वत:च्या घरी जातात.
                          आंतरभारतीतर्फे घेण्यात येणारे इतर कार्यक्रम म्हणजे आंतरभारती भाषा परिचय वर्ग, आंतरभारतीहिंदी मासिक पत्रिका,आंतरभारतीयुवक स्नेहसंमेलन,आंतरभारती प्रकृती परिचय,सागर परिचय,हिमालय परिचय,सायकल यात्रा,कथाकथन,युवक नेतृत्व शिबीर इत्यादी.याशिवाय बालकांसाठी बाल आनंद मेळावा,अभ्यास शिबीर,ओळख स्वत:ची,देशाची,निसर्गाची हे शिबीर.
                           या सर्व शिबिरातून प्रचलित शिक्षणपद्धतीत जखडलेल्या मुलाना मुक्त करणारे,भविष्यातील शांततामय विश्वाचे स्वप्न पहायला लावणारे शिक्षण दिले जाते.त्यांचे भावजीवन,वैचारिक जीवन,सर्जनशीलतेचे पैलू विकसित करण्याला इथे वाव दिला जातो.बालक नवनिर्माणशील,भविष्यातील संतुलित माणूस बनेल असा इथे प्रयत्न केला जातो.धर्म,भाषा,वंश,जन्मस्थान,स्त्री-पुरुष अशा कोणत्याही भेदाला थारा नसणारे निर्मळ वातावरण ठेवण्याचा प्रयत्न असतो.हे वातावरण बालकात समता,बंधुता ही मुल्ये रुजविण्यास सहाय्यभूत ठरते.अशा मेळाव्यातून वेगवेगळ्या प्रांतातील हजारो मुले सहभागी होतात.
                           हे वर्ष सानेगुरुजी जन्म शताब्दी वर्ष असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.पालगड या त्यांच्या जन्मगावी साने गुरुजींचे स्मारक उभारण्यात येत आहे.येथे विविध प्रांताची माहिती देणारी दालने असणार आहेत.सुसज्ज ग्रंथालय असेल.या पाच कोटींच्या प्रकल्पासाठी गुरुजींवर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील अनेक चाहते देणग्या देत आहेत.
                        साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न साकार होण्यासाठी हे प्रयत्न अपुरे आहेत.खरे तर आता माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातिल क्रांतीचा यासाठी खूप मोठा उपयोग करून घेता येण्याजोगा आहे.पण त्यासाठी अधिक हातांची गरज आहे.गुरुजींनी ही कल्पना मांडली त्यावेळेपेक्षाही याची गरज आज अधिक आहे.कारण देशात आसुरी शक्ती वाढत आहेत.भेदभावाचे,जातीजातीतील वैराचे विष समाजात भिनत आहे.धर्माच्या नावावर लोकाना भडकविले जात आहे.सर्वत्र दहशतवाद,भ्रष्टाचार,काळाबाजार यांचे साम्राज्य आहे.वाढत्या हिंसाचाराने सर्व सामान्यांची सुख- शांती हिरावून घेतलीआहे.राजकीय पक्ष युवकांचा उपयोग स्वत:च्या स्वार्थासाठी साधन म्हणून करीत आहेत.बंद, घेराव, तोडफोड यासाठी त्याना हवेत तरुण.हेच तरुणांचे हात विधायक कार्यासाठी लावण्याची भावप्रेरणा देण्याचे कार्य करावयाचे आहे.आंतरभारतीला. त्यांच्या प्रेरणाना, क्षमताना नवा आकार देण्याचे कार्य करावयाचे आहे आंतरभारतीला.जगाचे नेतृत्व करणार्‍या भारताचे विशाल स्वप्न या तरुणांना दाखवायचे आहे.आंतरभारतीचे  हे काम करण्यात ज्याचा पुढाकार असावा असे साने गुरुजीना वाटत होते,त्या व्यासंगी,बुद्धीजीवी लोकांनी उदासीनता झटकून आंतरभारतीचा प्रवाह जोरकस करावयास हवा.
                        ७२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत बापट आपल्या भाषणात म्हणाले होते."साने गुरुजी स्वत:च एक पेटती मशाल होते,आम्ही त्यावर आपल्या पणत्या लाऊन घेतल्या."साने गुरुजींच्या मशालीवर पेटलेल्या काहीच पणत्या शिल्लक आहेत,आणि अंधार इतका आहे की त्याचा उजेड पुरणार नाही.सानेगुरुजीन्सारखी पेटती मशाल जरी मिळाली नाही तरी आपली पणती या पेटत्या पणत्यांनी लाऊन घेऊयात.अशा लाखो पणत्या एकत्र आल्या तर अंध:कार दूर व्हावयास किती उशीर लागणार.साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात हीच त्याना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल!
आधार
१) आचार्य भागवत संकलित वाङमय खंड २संपादक - अच्युत भागवत
२) साधनयदुनाथ थत्ते स्मृतीविशेषांक शनिवार दिनांक १२ सप्टेंबर १९९८.
३)श्री. वा.य. परीट गुरुजींशी चर्चा
                          
.'माध्यम १९९८-९९ अंक-२ 'या टिळक विद्यापिठाच्या प्रकाशनातील सदर लेख छापावयास परवानगी दिल्याबद्दल विद्यापीठ व्यवस्थापनाचे आभार.